इलॉन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षी Starlink कंपनीला भारतात ‘हो’ म्हणायला मिळालं आहे. कंपनीला दूरसंचार विभागाकडून GMPCS (Global Mobile Personal Communications by Satellite) लायसन्स प्राप्त झालं आहे. यामुळे आता भारतातील कोट्यवधी लोकांसाठी सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट सेवा मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे. डोंगरांच्या कुशीत, दऱ्याखोऱ्यात आणि जिथे पारंपरिक इंटरनेट पोहोचणं कठीण होतं, अशा अतिदुर्गम भागांमध्येही आता सुपरफास्ट इंटरनेटचा अनुभव घेता येणार आहे.
Starlink भारतातील तिसरी कंपनी
Starlink ही भारतात सॅटेलाईट इंटरनेटसाठी सरकारी लायसन्स मिळवणारी तिसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी OneWeb आणि देशातील मोठी टेलिकॉम कंपनी Reliance यांनी देखील हे लायसन्स मिळवलं आहे. त्यामुळे आता भारतात उपग्रहांवरून इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी जोरदार स्पर्धा बघायला मिळणार आहे. या स्पर्धेमुळे अर्थातच भारतीय ग्राहकांना कमी किमतीत चांगली इंटरनेट सेवा मिळण्याची शक्यता आहे. सध्या Star link ची सेवा जगातील 100 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे आणि या कंपनीचा मुख्य उद्देश कमी वेळेत (Low Latency) हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस पुरवणं हा आहे.
दुर्गम भागांसाठी वरदान
भारतातील अनेक ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागांमध्ये आजही इंटरनेट पोहोचलेलं नाही. कारण या ठिकाणी इंटरनेटसाठी आवश्यक असणारी पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. मात्र, Star link सारख्या कंपन्यांच्या सॅटेलाईट आधारित इंटरनेटमुळे या भागातील लोकांचं जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक सेवांपर्यंत त्यांची पोहोच सुलभ होणार आहे. OneWeb, Reliance आणि Star link यांच्यासोबतच Amazon ची Kuiper प्रोजेक्ट देखील भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा देण्यासाठी उत्सुक आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
Starlink Plans परवडणार का?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे Star link च्या इंटरनेट प्लॅन्सची किंमत भारतीयांना परवडणार का? मीडियामधील काही रिपोर्ट्सनुसार, Starlink भारतात प्रमोशनल ऑफर अंतर्गत केवळ $10 (जवळपास ₹840) मध्ये अनलिमिटेड डेटा प्लॅन देऊ शकते. जर हे खरं ठरलं, तर नक्कीच भारतातील इंटरनेट युजर्ससाठी ही खूपच चांगली बातमी असेल. कारण सध्या अनेक ठिकाणी लोकांना चांगल्या इंटरनेटसाठी जास्त पैसे मोजावे लागतात.
पुढील आव्हान काय?
लायसन्स मिळाल्यानंतर Starlink समोर आता एक महत्त्वाचं आव्हान आहे. कंपनीला आता IN-SPACe (Indian National Space Promotion and Authorization Center) कडून अंतिम मंजुरी मिळवणं बाकी आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर Starlink भारतात आपली सेवा सुरू करू शकेल. मात्र, ही अंतिम प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नेमका किती वेळ लागेल, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
स्पर्धेमुळे फायदा
भारतात एकाच वेळी तीन मोठ्या कंपन्या सॅटेलाईट इंटरनेट सेवा देण्यासाठी तयार झाल्यानं, नक्कीच ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. किमती कमी होण्याची शक्यता आहे आणि सोबतच दर्जेदार सेवा मिळण्याचीही अपेक्षा आहे. त्यामुळे आता डोंगर-दऱ्यांमधील लोकांनाही हाय-स्पीड इंटरनेट वापरण्याचं स्वप्न लवकरच साकार होऊ शकतं. इलॉन मस्क यांच्या Starlink च्या या निर्णयामुळे भारतातील डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती येण्याची शक्यता आहे.