मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेतील मे महिन्याचा हप्ता आजपासून (५ जून) त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मे महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आजपासून सर्व पात्र महिलांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागतील. काही जणांना आज पैसे मिळतील, तर बाकीच्या लाभार्थ्यांना पुढील दोन ते तीन दिवसांत म्हणजे साधारणपणे ७ जून पर्यंत रक्कम मिळेल.
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार महिलांच्या कल्याणासाठी काम करत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा निर्धार आहे.
त्यामुळे, सर्व लाडक्या बहिणींनी त्यांच्या बँक खात्याची माहिती तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. लवकरच त्यांना मे महिन्याचा हप्ता मिळेल आणि त्यामुळे त्यांना आर्थिक मदत होईल.